सध्या महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय घडामोडी पाहता सत्तेचे दान हे कोणत्या गटाच्या पदरात पडणार हे पाहणे फारच उत्कंठावर्धक होत चालले आहे! महाराष्ट्रातील चौकाचौकात गल्ली-गल्ली मध्ये आता पुढे काय होणार? या एकाच विषयावर विविध मतांतरे होत त्यावर चर्चासत्र रंगताना दिसत आहेत! सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडामुळे सेनेला आता सत्ता सोडावी लागते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या ही जास्त असल्याने शिवसेनेकडे मात्र काहीच आमदार शिल्लक राहिले नाहीत. अशा बिकट परिस्थितीत राज ठाकरे जर शिवसेनेमध्ये असते तर उद्धव ठाकरेंना मोठे मानसिक बळ देखील मिळाले असते अशी चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक शिवसैनिक तसेच ठाकरे कुटुंबीयांची जी जवळची माणसे आहेत त्यांच्यामध्ये देखील अशाच प्रकारची चर्चा सुरू झाली आहे, की राज राज ठाकरे हे शिवसेनेत उद्धव ठाकरे यांसोबत असते तर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली नसती, शिवसेनेत झालेले ही अंतर्गत बंड त्यांनी नक्कीच मोडून काढले असते!
याबाबत एका मराठी वृत्तवाहिनी सोबत बोलताना राजकीय विश्लेषक अमित तिवारी यांनी असे मत व्यक्त केले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवली,तेव्हा देखील राज ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख असावेत अशीच पक्षातील अनेकांची इच्छा होती, त्यानंतर २००६ चाली राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली. राजसाहेब जर शिवसेनेत असते तर त्यांनी उद्धव यांना या पेचप्रसंगातून नक्कीच बाहेर काढले असते!’
मुळात शिवसेनेचा उदय हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर पक्षाला प्रचंड जनाधार देखील लाभला. अगदी पक्षाने राज्यातील सत्ता देखील काबीज करण्यापर्यंत मजल मारली आहे! मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडल्याचे दिसत आहे। एकनाथ शिंदे पक्षावर दावा ठोकताना दिसत आहेत, यातच आमदारांनीही शिवसेनेची साथ सोडल्यामुळे ठाकरे सरकार हतबल झाले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहनही केले, मात्र त्याचा देखील काही उपयोग झाला नाही! या सर्व परिस्थिती मध्ये आज राज ठाकरे शिवसेनेत असते तर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली नसती, राज ठाकरे आपल्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असते आणि शिवसेनेतले हे बंड त्यांनी नक्कीच मोडीत काढले असते अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.