आयसीसीने वनडे संघ क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत पाकिस्तानच्या संघाला जबरदस्त फायदा झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानने विंडीजला पराभूत केले असून त्याचा थेट फायदा पाकिस्तानला झाला आहे. एक काळ असा होता की आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये टीम इंडिया पहिल्या ३ मध्ये असायची पण आता टीम इंडिया क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरली आहे.
एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानने भारताला मागे टाकत चौथे स्थान पटकावले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वनडे संघ क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. विश्वविजेता इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. किवी संघाचे १२५ रेटिंग गुण आहेत, इंग्लंडचे १२४ गुण आहेत तर कांगारू संघाचे १०७ गुण आहेत.
त्याचवेळी, आयसीसीने जारी केलेल्या ताज्या एकदिवसीय संघ क्रमवारीत पाकिस्तानचा संघ १०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे, तर भारतीय संघ १०५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. यासह दक्षिण आफ्रिका सहाव्या तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. श्रीलंका आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे, तर अफगाणिस्तानचा संघ दहाव्या स्थानावर आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा३ -० असा क्लीन स्वीप केला आहे, ज्याचा फायदा पाकिस्तानला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत झाला आहे. पाकिस्तानने पहिला एकदिवसीय सामना ५ गडी राखून, दुसरा एकदिवसीय सामना १२० धावांनी आणि तिसरा एकदिवसीय सामना ५३ धावांनी जिंकला.
. पाकिस्तानच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या जात असलेल्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा ५३ धावांनी पराभव करून मालिका३-0 ने जिंकली. मुलतान येथे झालेल्या या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २१६ धावांवर आटोपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर इमाम-उल-हक आणि फखर झमान यांनी पहिल्या विकेटसाठी 100 चेंडूत 85 धावांची भागीदारी केली. फखरने ४८ चेंडूत 35 तर इमामने ६८ चेंडूत ६२ धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अवघ्या १ धावांवर बाद झाला. त्याचवेळी पाकिस्तानी स्टार मोहम्मद रिझवानही केवळ ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
मधल्या फळीतील अपयशानंतर ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शादाब खानने खुशदिल शाहसोबत सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. खुशदिलने ४३ चेंडूत ३४ तर शादाबने ७८ चेंडूत ८६ धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने १० षटकात ४८ धावा देत ४ बळी घेतले. त्याचवेळी कीमो पॉलने २ बळी घेतले.