जगप्रसिद्ध T-२० क्रिकेट लीग बनलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा प्रत्येक हंगाम एकापेक्षा एक सरस असतो. आयपीएलची क्रेझ चाहत्यांच्या मनात याच कारणामुळे कायम आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामाचीही क्रेझ दिसून येत आहे. या हंगामापूर्वी नुकताच मेगा लिलाव पार पडला आहे. या लिलाव प्रक्रियेत यावेळी ८ नव्हे तर १० फ्रँचायझींनि सहभाग घेतला होता, जे खेळाडूंच्या बाबतीत आपली पूर्ण ताकद दाखवताना दिसत आहेत. फ्रँचायझी आपल्या संघाच्या संयोजनाबाबत पूर्णपणे तयार असल्याचे दिसते, ज्यामध्ये देश- विदेशातील खेळाडू त्यांच्या रणनीतीनुसार बोली लावत आहेत.
View this post on Instagram
मेगा लिलावात काही खेळाडू अनुभवी देखील आहेत, ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज अजिंक्य रहाणेचे नाव आहे. रहाणेला आयपीएलचा प्रचंड अनुभव आहे, पण लिलावात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अजिंक्य रहाणेने कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीसाठी १ कोटीच्या मूळ किमतीत केवळ १ कोटींच्या रकमेत संघाशी जूडला आहे. तो आता केकेआरच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी फलंदाज बनलेल्या अजिंक्य रहाणेला आयपीएलचा खूप खास अनुभव आहे. अजिंक्य रहाणे या लीगच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहे, तो आतापर्यंत राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. अजिंक्य रहाणेची २०१६ पर्यंत चांगली कामगिरी होती, पण तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. रहाणेने आतापर्यंत १५१ आयपीएल सामने खेळले असून त्यात त्याने ३१.५२ च्या सरासरीने ३९४१ धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे अलीकडे त्याच्या फॉर्ममुळे टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. आयपीएल पूर्वी तो रणजी ट्रॉफी खेळणार असून यामुळे त्याला त्याची कसोटी कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्याची संधी मिळेल, असे मानले जात आहे. यानंतर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून भारत आणि श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ टी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार आहेत.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने तिन्ही सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक झळकले. रहाणेला मालिकेतील ६ डावात केवळ १३६ धावा करता आल्या. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ५८ धावा केल्या तर सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीत त्याने ४८ धावा केल्या. याशिवाय तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही आणि टीकाकारांच्या निशाण्यावर आला.