IPL 2022 मेगा लिलावादरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन रोहित शर्माच्या टीम मुंबई इंडियन्सने विकत घेतला होता. अर्जुन तेंडुलकरची मूळ किंमत २० लाख रुपये होती, मुंबई इंडियन्सने त्याला ३० लाख रुपयांना खरेदी केले. मात्र, आता अर्जुन सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
IPL २०२२ चा मेगा लिलाव संपला आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने महान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला ३० लाख रुपये देऊन सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनची मूळ किंमत २० लाख रुपये होती. या लिलावात मुंबई इंडियन्सशिवाय गुजरात टायटन्सनेही अर्जुनसाठी बोली लावली पण शेवटी अर्जुन पुन्हा मुंबईचाच झाला. मागील हंगामातही त्याला मुंबई इंडियन्स संघाने २० लाख रुपयांना खरेदी केले होते. मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाल्यानंतर अर्जुनने व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो चांगलाच ट्रोल होत आहे.
अर्जुनला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, काय बातमी आहे, आता घोड्यांच्या शर्यतीत गाढवेही धावतील. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘भावा, किती घाबरतोय, कोणी तरी पाणी द्या. एकाने लिहिले की, हा व्हिडीओ सेव्ह करून ठेव, पुढच्या वेळीही असाच पोस्ट करावा लागेल. दुसऱ्या युजरने लिहिले, ट्रेंट बोल्टला सोडून याला घेतले?
https://www.instagram.com/p/CZ8Yp6RBXfg/
रोहित नावाच्या युजरने लिहिले की, काळजी करू नको तु नेहमी मुंबईत असशील. फक्त तुला खेळवणार नाहीत ही वेगळी बाब आहे. निकम याने लिहिले, हा तर बॉलीवूड वाला नेपोटिज्म झाला आहे. आता विराट कोहलीची मुलगीही खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकरला सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अर्जुन अनेकदा ट्रोल झाला आहे.
अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडू आहे जो त्याच्या गोलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करतो. मुंबई इंडियन्स संघ खेळाडू निर्माण करण्यासाठी ओळखला जातो. मागच्या वर्षी अर्जुनला मुंबईने घेतले होते तेव्हा त्याच्यावर नेपोटिज्मचा आरोप झाला होता. सोशल मीडियावर या विषयावर बरेच काही बोलले गेले होते. सचिन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळल्यामुळे हा प्रकार घडला होता. त्याचबरोबर तो या संघाचा मार्गदर्शकही आहे. अशा स्थितीत मुंबईतून अर्जुनच्या खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, अर्जुनच्या कौशल्यामुळे त्याला संघात सामील केले असल्याचे मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले आहे.