‘पावनखिंड’ सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना एकाचवेळी टक्कर देत आहे. या सिनेमातील कलाकारांचंदेखील रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे. पण सिनेमाचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर! ‘पावनखिंड’ या सिनेमाने अजय पुरकर यांना एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.
‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘अॅव्हेंजर्स’ अशा विविध हॉलिवूडपटांमधील सुपरहिरोजनी जगभरातील रसिकांना भुरळ घातली. प्राणांची बाजी लावून पराक्रम गाजवत इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झालेले खरे सुपरहिरो महाराष्ट्राच्या लाल मातीत होऊन गेले आहेत. हॉलिवूडपटांमधले सुपर हिरोज काल्पनिक आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अजरामर झालेले मावळे हे खरे आहेत. हे शूरवीर मावळेच खरे सुपरहिरो होते आणि आहेत आणि कायमच राहतील! जिवाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रेरणादायी काम ‘पावनखिंड’ या चित्रपटानं केलं आहे.
View this post on Instagram
पावनखिंड’ सिनेमात अजय पुरकर यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने अजय पुरकर यांना नवी ओळख दिली आहे. त्यांच्या अभिनयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. कधी नायक तर कधी खलनायक म्हणून अजय पुरकर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. याआधी देखील त्यांनी अनेक हिंदी-मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
अजय पुरकर यांचे ‘कोडमंत्र’ नावाचे नाटक प्रचंड गाजले होते. या नाटकात त्यांनी मनमिळाऊ अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत काम केले होते. बालगंधर्व, प्रेमाची गोष्ट, कदाचित, फेरारी की सवारी, रिस्पेक्ट, फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड अशा अनेक गाजलेल्या प्रोजेक्टचा भाग अजय पुरकर बनलेले आहेत.
View this post on Instagram
थिएटरमध्ये जाऊन ‘पावनखिंड’ पाहणाऱ्या प्रेक्षकांनी शिवरायांची गाणी म्हणत हा आनंद साजरा केला आहे. पावनखिंड चित्रपटाची मोहिनीच अशी आहे की बघणारा प्रत्येकजण भारावल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी चित्रपट पाहून दिली आहे.
‘पावनखिंड’ या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. तसेच या चित्रपटातील गाण्यांवर देखील विशेष मेहनत घेण्यात आली आहे जेणेकरून चित्रपट पाहताना प्रेक्षकांना इतिहासकाळात गेल्यासारखे वाटेल! या चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यात १५ कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे.