आपल्या स्वर्गीय आवाजाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करत, भारताची ‘गानकोकिळा’ म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या लता दीदींच आज निधन झालयं. लतादीदींच्या जाण्याने भारताच्या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला आपल्या आवाजाने नवंसंजीवनीची अनुभूती देत असलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकात मग्न झाला आहे.
“असेन मी,नसेन मी, तरीही असेल गीत हे.फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे!” जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे समजलं त्या संगीत विश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वाराची दैवी देणगी’ मानत वंदन करतात, अशा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली असल्याचे वृत्त समजते. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील काही काळ आधी पॉझिटीव्ह आला होता. परंतु कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण त्यांना न्युमोनियाची लागण झाली असल्यानं त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
View this post on Instagram
देशासह जगभरातील संगीत रसिकांना जगण्यासाठी अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज पूर्ण देश शोकमय झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आपल्या सुरांनी भरभरून मंत्रमुग्ध केले आहे, तितका आनंद आजवर देशाच्या कोणत्याही प्रसिध्द संगीतकाराने दिलेला नाही.
आकाशात देव आहे का असं जर कोणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे! दिवस-रात्र अशी कोणतीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लता दीदींचा स्वर या जगात कुठे ना कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या संगीत महतीचं वर्णन केलं होतं.
करोडो प्रेक्षकांना एकाचवेळी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणे हा मान हे प्रेम सहसा कोणाच्या वाट्याला येत नाही! अगदी ८०-९० च्या काळापासून ते आज २०२२ च्या दशकपर्यंत लता दिदींची आवाजाची भुरळ सर्व वयोगटातील श्रोत्यांवर आज ही तितकीच ताजी आहे! लता
दीदींची प्रतिभा बऱ्याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीतसाधना, रसाळ वाणी आणि त्यांची मेहनत या सर्वांचा खूप मोठा वाटा होता. जोपर्यंत प्रत्येक भारतीयांच्या मनात संगीतप्रेम व देशप्रेम जागं आहे तोपर्यंत प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी देशभर वाजत राहतील.पहाटेच्या भक्तिगीतांतुन, कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गजलांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांनी रचलेल्या पसायदानातून आणि तुकोबांच्या गोड अभंगांतून त्यांचा आवाज प्रत्येक श्रोत्यांच्या मनांत कायमचा कोरला जाणार आहे.
संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दललता दीदींना २००१ साली ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी आजवर या गानसम्राज्ञीला गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याचा आदर करत त्यांच्या नावाने लता मंगेशकर नावाचा पुरस्कार देण्यासही सुरुवात केली आहे.
View this post on Instagram
तर मध्य प्रदेश सरकरनंही त्यांच्या या दैवी कार्याची दखल घेत १९८४ सालापासून संगीत क्षेत्रीतील चमकदार कामगिरी करणाऱ्या गायकांना लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अजूनपर्यंत अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी त्यांच्या दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या मनात दीदींनी प्रज्वलित केलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं तेवत राहील.
लतामंगेशकर यांचे निधन हे देशाच्या संगीत क्षेत्रातील मोठे नुकसान आहे. त्यांची गाणी अनेक पिढ्यांच्या ओठांवर कायमच स्मरणात राहतील.
या सुरांच्या सम्रानीला भावपूर्ण श्रद्धांजली!