भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील ५ सामन्यांच्या T-२० मालिकेतील चौथा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला, तर तिसऱ्या टी-२० मध्ये टीम इंडियाने पुनरागमन करत आफ्रिकन संघाचा पराभव केला होता. अशा स्थितीत ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला चौथी टी-२० जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधायची आहे. गेल्या सामन्यात, भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत चांगली कामगिरी केली होती, तरीही टीम इंडिया मध्ये अजूनही अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे चौथ्या टी-२० मध्ये दोन मोठे बदल होऊ शकतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांच्या T-२० मालिकेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या मालिकेचा भाग नाही, त्यामुळे श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरने तुफानी खेळी खेळली होती. त्याने ३ सामन्यात २०० हून अधिक धावा केल्या होत्या पण दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याची बॅट अपेक्षेप्रमाणे बोलत नाही. श्रेयस अय्यरला आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यां मध्ये केवळ ९० धावा करता आल्या आहेत.
View this post on Instagram
अशा स्थितीत, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या चौथ्या T-२० मधून त्यांना बाहेर काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. IPL २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या दीपक हुडाची त्याच्या जागी निवड होऊ शकते. या मोसमातील १५ सामन्यांत त्याने ४५१ धावा केल्या आहेत. कर्णधार राहुलने त्याला मधल्या फळीत संधी दिली होती. त्याच वेळी, दीपक हुडाने भारतासाठी तीन टी-२० सामने खेळले आहेत आणि त्याने आतापर्यंत केवळ २१ धावा केल्या आहेत. मात्र, त्याची अलीकडची कामगिरी पाहता कर्णधार पंत त्याला चौथ्या टी-२० मध्ये संधी देऊ शकतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या T-२० मालिकेत, आवेश खान देखील आता पर्यंत फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत त्याला एकही बळी घेता आलेला नाही. त्यामुळे शेवटच्या षटकात त्याच्या गोलंदाजीवर फारसा आत्मविश्वास दाखवता येत नाही. यामुळेच कर्णधार पंत अर्शदीप सिंगला चौथ्या टी-२० सामन्यात संधी देऊ शकतो.