हिंदी बिग बॉसचे आत्तापर्यंतचे सर्व पर्व जोरदार गाजले आहेत. बिगबॉसच्या सुंदर घरात राहणारे लोक, त्यांची एकमेकांविषयीची वागणूक, टास्क खेळताना होणारी त्यांची आक्रमक खेळी, त्यांच्यात फुलणारे प्रेम आणि शेवटी शेवटपर्यंत घरात टिकून राहणारा एकमेव विजेता या सर्व गोष्टी प्रेक्षक सुरुवातीपासून आवर्जून पाहतात.
हिंदी बिग बॉसच्या लोकप्रियतेनंतर कलर्स मराठी वाहिनीने मराठीतही बिग बॉस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आणि आतापर्यंत त्याचे तीन पर्व यशस्वीरित्या संपन्न देखील झाले आहेत! डिसेंबर महिन्यात झालेल्या तिसऱ्या पर्वात सांगलीचा मराठमोळा गडी विशाल निकम विजयी ठरला आहे.
आणि सध्या हिंदी बिग बॉस देखील त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. यावेळीचे पर्व देखील भांडणे-गॉसिप आणि आगळ्या वेगळ्या जंगल थीमच्या ट्विस्टने भरलेली होते. या पर्वाचा अंतिम विजेता कोण ठरेल परंतु हे पाहणे देखिल तितकेच लक्षवेधी ठरणार आहे!
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहणारा बिग बॉस १५ (Bigg Boss 15) या शोचा ग्रँड फिनाले अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आज (३० जानेवारी) बिग बॉसला त्याच्या १५ व्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. सध्या या घरातील तेजस्वी प्रकाश , करण कुंद्रा , शमिता शेट्टी, निशांत भट्ट हे स्पर्धक विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, सूत्रांच्या रिपोर्टनुसार, घरातील या स्पर्धकांशिवाय अन्य एक स्पर्धकच बिग बॉसची ट्रॉफी घेऊन जाणार आहे.
काल झालेल्या ग्रँड फिनालेच्या पहिल्या भागात रश्मी देसाईला हा शो सोडावा लागला. त्यामुळे आता घरात शेवटचे ५ स्पर्धक राहिले आहेत. यात प्रतिक सहजपाल, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हे एवढेच स्पर्धक राहिले आहेत. त्यातही तेजस्वी आणि करण हा शो जिंकतील अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. मात्र, या दोघांऐवजी शमिता शेट्टीच हे पर्व जिंकणार असल्याचं काही नेटकर्यांचं म्हणणं आहे.
यातील निशांत भट्ट पैशांची सुटकेस घेऊन हा शो सोडणार असल्याचे समजते तर त्याच्या पाठोपाठ करण आणि तेजस्वीदेखील पैशांची बॅग घेऊनच हा शो सोडणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या रिपोर्टनुसार मिळाल्याची समजते. त्यामुळे घरात केवळ शमिता आणि प्रतिक हे दोन स्पर्धक उरणार आहेत. या दोघांमध्येच ग्रँड फिनाले रंगणार असून यांच्यापैकी एक स्पर्धक यंदाची बिग बॉस १५ ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे.
दरम्यान, शमिता शेट्टी हीच यंदाच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात असल्याचे समजते. कारण, शमिताने तिसऱ्यांदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. यात टास्क खेळण्यापासून घरातील सदस्यांसोबत असलेली तिची बॉण्डिंग या सगळ्यासाठी ती सदैव चर्चेत राहिली आहे. विशेष म्हणजे शमितासाठी आतापर्यंत सोशल मीडियावर १८ मिलिअन ट्विट्स करण्यात आले आहेत.! त्यामुळे यंदाच्या पर्वात ती विजेती होणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या पर्वात नेमकं कोण विजेता होणार हे आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेमध्येच कळणार असल्याने फिनालेचा निकाल सध्यातरी गुलदस्त्यातच असणार आहे!