भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही दिवसांपूर्वी महत्वपूर्ण निर्णय घेतले, त्यातला एक म्हणजे त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांपूर्वी बायो बबल सोडले आणि चक्क सुट्टीवर निघून गेला आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघात त्याला सामील करून घेण्यात आलेले नाही. यातच ३३ वर्षीय विराटचा नवा लूक सोशल मीडियावर बुधवारी तुफान वेगात व्हायरल झालेला दिसतोय! या फोटोत विराट टिपिकल पंजाबी लूकमध्ये दिसत आहे. यात सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्माही आहे, विराट व अनुष्का यांची लवकरच नवीन जाहीरात येणार असल्याचे वृत्त समजत आहे आणि त्याच जाहिरातीच्या चित्रिकरणासाठी विराटने हा लूक केला आहे अशी चर्चा रंगली आहे.
कोणा कॅमेरामॅनने काढलेले हे फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाले आहेत. २०१३ मध्ये एका जाहीरातीत विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट झाली होती आणि काही वर्षे एकमेकांना डेट करून २०१७च्या अखेरीस दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले. मागच्याच वर्षी त्यांच्या घरी एका गोड परीचे देखील आगमन झाले आहे आणि त्यांनी तिचं नाव वामिका असे ठेवले आहे.
View this post on Instagram
येत्या काही दिवसांनंतर विराटकडे फक्त भारताच्या वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपद असणार आहे. त्यामुळे विराट आता या दोन कर्णधारपदांना कसा न्याय देतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. त्यामुळे आता आयपीएल आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर विराटची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. विराटने ट्वेंटी-२० मालिकेतून रजा जरी घेतली असली तरी तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बायो बबलमध्ये दाखल होणार असल्याच्या बातम्या रंगत आहेत. मोहाली आणि बंगळुरू येथे हे दोन सामने होतील आणि विराट त्याचा १००वा कसोटी सामना मोहालीत खेळणार आहे.
याचदरम्यान काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने त्याच्या ट्विटर हँडलवरुन त्याच्या चाहत्यांना एक टास्क दिला होता. या टास्कमध्ये एक फोटो शेअर करत विराटने चाहत्यांना असे चॅलेंज केले होते की, एकाच कपड्यात असलेले विराट कोहलीचे १० फोटो विराटने शेअर केले होते. चाय पे चर्चा करतानाचे हे १० जण वेगवेगळ्या पोझमध्ये दिसून येत आहेत. एकच सुट, दाढीचा सेम कोरीव आकार आणि स्टाईलमुळे हे सर्वच सेम टू सेम दिसून येतात. पण असे असूनही त्यात एक फोटो वेगळा असून तोच फोटो ओळखण्याचे काम विराटने चाहत्यांना दिले होते. त्याच्या या टास्कला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद देत त्या पोस्टवर कॉमेंट्सचा पाऊस पाडला होता!