ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि कांगारू क्रिकेटर नॅथन लायनचे कौतुक केले आहे. आगामी काळात हे दोन्ही खेळाडू त्याचा आणि मुथय्या मुरलीधरनचा कसोटी बळी घेण्याचा विक्रम तोडू शकतात, असे त्याने म्हटले आहे. अश्विन आणि लायन हे सध्या कसोटी क्रिकेट मधील सर्वोत्तम फिरकीपटू आहेत.
शेन वॉर्नने आर अश्विन आणि नॅथन लियॉनबद्दल भविष्यवाणी वर्तवली आहे की, दोघेही १००० विकेट घेऊ शकतात. ५२ वर्षीय माजी कांगारू क्रिकेटपटू हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हणाला, मला आशा आहे की अश्विन आणि लायन दोघेही (वॉर्न आणि मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतात) कारण क्वालिटी स्पिनर कसोटी क्रिकेट अधिक मनोरंजक बनवतात.
उजव्या हाताचा लेग-स्पिनर शेन वॉर्न पुढे म्हणाला की, मला आशा आहे की अश्विन १००० कसोटी विकेट आणि लायन १००० कसोटी विकेट घेईल. रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ८४ कसोटी सामन्यांमध्ये ४३० विकेट्स घेतल्या आहेत, तर नॅथन लायनने १०५ सामन्यांमध्ये ४१५ विकेट घेतल्या आहेत. हे दोन फिरकीपटू आहेत, जे वॉर्न आणि मुरलीच्या रिकॉर्ड जवळ पोहोचू शकतात.
शेन वॉर्न बद्दल बोलायचे झाले तर शेन वॉर्नची गणना जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये केली जाते. वॉर्न हा श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन नंतर कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणाऱ्या या लेग स्पिनरने या दिवशी म्हणजे २ जानेवारी १९९२ रोजी सिडनी येथे भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. विशेष म्हणजे वॉर्नने आपला पहिला कसोटी विकेट टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याची घेतली होती. जो त्या कसोटीचा प्लेयर ऑफ द मैच होता.
मुरलीधरनने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५३४ विकेट घेतल्या आहेत. उजव्या हाताचा ऑफ ब्रेक गोलंदाज मुरलीधरनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३४७ बळी आहेत. यामध्ये कसोटीत ८००, एकदिवसीय सामन्यात ५३४ आणि T-२० मध्ये १३ बळींचा समावेश आहे. मुरलीधरनचा जून २०१७ मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला होता. त्याने १३३ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ८०० बळी घेतले आहेत, ज्यात ६७ वेळा ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.