पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीवर मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीच्या जागी मी असतो तर मी लग्न केले नसते आणि फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले असते, असे त्याने म्हटले आहे.
विराट कोहलीबद्दल बोलताना रावळपिंडी एक्सप्रेस नावाच्या या प्रसिद्ध पाकिस्तानी गोलंदाजाने पत्रकार अभिषेक त्रिपाठीला सांगितले की, विराटसोबत काय चालले आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मी त्याच्या कर्णधारपदाच्या बाजूने नव्हतो. त्याच्या जागी मी असतो तर एवढ्या लवकर लग्न केले नसते, फक्त धावा केल्या असत्या आणि क्रिकेटचा आनंद लुटला असता, पण लग्न करून त्याने काही चुकीचे केले असे नाही. पण विराटच्या जागी मी असतो तर मी कर्णधार झालो नसतो, फक्त त्या वेळेचा आनंद लुटला असता.
याशिवाय शोएब अख्तरने स्पोर्ट्सशीही संवाद साधला, तो म्हणाला की, ‘मी T-२० वर्ल्ड कप दरम्यान दुबईमध्ये होतो आणि मला कळले की जर भारतीय संघ हा वर्ल्डकप जिंकला नाही, तर विराट साठी मोठ्या अडचणी निर्माण होणार होत्या. विराटच्या विरोधात अनेक लोक आहेत, याच कारणामुळे त्याने कर्णधारपद सोडले आहे. प्रत्येक स्टार खेळाडूला अडचणींचा सामना करावा लागतो. कोहलीला या कठीण काळाचा धैर्याने सामना करण्याची गरज आहे. तो कठीण काळातून जात आहे आणि विराटने यातून बाहेर पडायला हवे.
त्याने सांगितले की, प्रत्येक खेळाडू ज्याला स्टार दर्जा आहे, त्याला समस्यांचा सामना करावा लागतो, परंतु त्याला घाबरण्याची गरज नाही. अनुष्का चांगली स्त्री आहे आणि विराट चांगला माणूस आहे. त्यांनी धाडसी असले पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीबद्दल घाबरू नये. संपूर्ण देशाला तो हवा आहे, फक्त हे दिवस त्याच्यासाठी कसोटीचे दिवस आहेत आणि त्याला येथून बाहेर पडावे लागेल.
आपल्या धोकादायक बाऊन्सरने फलंदाजांच्या स्वप्नात येणाऱ्या या गोलंदाजाने पुढे म्हणाला की, विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून ५० शतके झळकावू शकतो आणि जर त्याने तसे केले तर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय अगदी योग्य होईल.
तो म्हणाला, ‘जर विराट येत्या ५-६ महिन्यांत चांगला खेळला, तर कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने तो खूश असेल आणि त्याच्या कारकिर्दीत १२० आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याची शक्यता आहे. आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या खेळाडूने विराटला आपल्या खेळाचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे.