अगदी ४६ वर्षांपासून आपल्या लाडक्या अशोकमामांनी जपुन ठेवली आहे एक खूप खास गोष्ट!

मराठी सिनेमात आपल्या विनोदांनी खळखळून हसायला लावणार एक खास रसायन म्हणजे अशोक सराफ. सिनेइंडस्ट्रीत सगळेजण त्यांना अशोकमामा याच नावाने ओळखतात. अशोक मामांच्या बोटात साधीशीच एक चांदीची अंगठी आहे, नटराजाची कोरीव प्रतिमा असलेल्या या अंगठीचा किस्सा अशोक मामांनीच एका इंटरव्ह्यू च्या मार्फत शेअर केला आहे. १९७४ साली बोटात घातलेली ही चांदीची अंगठी अशोकमामांनी गेल्या ४५ वर्षांत एकदाही हातातून काढलेली नाही. याचं खास कारण म्हणजे त्यांच्यासाठी ही अंगठी लक फॅक्टर ठरली आहे. आपल्या वापरात असलेली एखादी वस्तू भाग्यशाली असावी हे अगदी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या बाबतीतच असतं. तसेच ते अशोक मामांच्या बाबतीतही आहे. तेव्हा त्यांचा विजय लवेकर नावाचा एक मित्र मेकअपमन म्हणून काम करायचा.

त्याचं चांदीकाम व सराफाची एक छोटी पेढी होती. एकदा त्याने बनवलेल्या काही अंगठ्या घेऊन तो स्टुडिओत आला होता. त्याने अशोकमामांना त्यातली एक अंगठी बोटात घालण्यासाठी सिलेक्ट करायला दिली, मामांनी हाताला लागणारी पहिलीच अंगठी घेतली आणि सहजच अनामिकेत चढवली. अगदी सोनाराकडे माप देऊन बनवावी एवढ्या सहजपणे ती मामांच्या बोटात जाऊन बसली! त्यावर नटराजाची प्रतिमा कोरलेली होती. अंगठी बोटात घालून तिच्याकडे निरखून पाहत अशोक मामा विजयला म्हणाले की,

“आता ही अंगठी माझी”
ती अंगठी मामांना अतिशय पसंत पडली आणि त्यांच्या बोटात ती परफेक्ट बसली देखील, खरंतर इथपर्यत तो विषय संपला होता. पण त्यानंतर तीन दिवसांनी असं काहीतरी झालं की अशोकमामांच्या त्या चांदीच्या अंगठीविषयी असलेल्या भावनाच बदलून गेल्या.

तोपर्यंत अशोक मामांची कारकीर्द चाचपडत सुरू झाली होती. अंगठीचा किस्सा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अशोक मामांना पांडू हवालदार या सिनेमाची ऑफर आली. या सिनेमाने मात्र त्यांचे आयुष्यच एकदम बदलून गेले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.नवंनवीन सिनेमांची आणि ते सिनेमे बॉक्सऑफीसवर हिट होण्याची त्यांची घोडदौड सुरूच राहिली. ही गोष्ट सांगताना अशोकमामा अस देखील म्हणतात की श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण ही अंगठी बोटातून काढायचीच नाही असं मी त्याचवेळी ठरवलं. याबाबतची अजून एक गंमत म्हणजे, एकदा एका चित्रपटात अशोकमामांना भिकाऱ्याची भूमिका करायची होती. रस्त्यावर बसून हात पसरून भीक मागताना हातातील ती ठसठशीत अंगठी कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होती.

अंगठी तर हातातून काढायची नाही आणि भिकारीच्या भूमिकेला योग्य न्याय पण द्यायला हवा असा प्रश्न तेव्हा अशोकमामांपुढे उभा राहिला. त्यावेळी त्यांनी अंगठीवरचा नटराजाची प्रतिमा असलेला मोठाभाग तळहाताकडे वळवला आणि नुसती रिंग वरच्या बाजूला ठेवली. यामुळे मुख्य प्रश्नही सुटला आणि अंगठी हातातून काढावी ही लागली नाही. थोडक्यात काय, अशोकमामांची ही अंगठी म्हणजे त्यांचा जीव की प्राण बनली आहे. जेव्हा निवेदिता यांच्यासोबत अशोक मामांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर निवेदिता यांनी अशोक सराफ यांना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली होती. लग्नानंतरच्या काही दिवसात ती सोन्याची अंगठी अशोक मामांनी हरवुन टाकली, पण गेल्या ४६ वर्षापासून हाताच्या बोटात असलेली चांदीची लाभदायी अंगठी मात्र अशोकमामा आजही अगदी जीवापाड जपतात एवढं नक्की!

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप