लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक खळखळून हसायला लावणारं भन्नाट व्यक्तिमत्व! आपल्या लाडक्या लक्ष्याने विनोदाच्या अफलातून टायमिंगमुळे सर्वांना खळखळून हसायला भाग पाडले होते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी नेहमीच हाऊसफुलची पावती दिली होती. आज आपण या लोकप्रिय अभिनेत्याबद्दल एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत, जी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल! लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी चक्क एका सिनेमा मध्ये काम करण्यासाठी फक्त एक रुपया मानधन घेतले होते. वाचून थक्क झालात ना? पण हो ही बातमी खरी आहे!
View this post on Instagram
अभिनेता व दिग्दर्शक असणारे महेश कोठारे यांच्या सिनेमामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना कायमच विशेष स्थान असायचे. महेश कोठारे यांनी दिग्दर्शक म्हणून ज्यावेळी पहिला चित्रपट बनवला होता त्यावेळी त्यांच्याकडे मानधन देण्याऐवढे बजेट नव्हते. त्यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत यांना आपल्या चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यांच्या हातात एक रुपया दिला. तो एक रुपया लक्ष्मीकांत यांनी हसत हसतआनंदाने स्वीकारला आणि संपूर्ण चित्रपट एक रुपये मानधनावर पूर्ण केला होता.
महेश कोठारेंना लोकप्रिय हिंदी चित्रपट ‘प्यार किये जा’ याचा मराठीत रिमेक बनवायचा होता. सर्व पात्रांची जुळवणी झाली पण मेहमूद सारख्या हरहुन्नरी कलाकारासाठी त्यांना महत्वाचं पात्रच मिळेना. त्यावेळी महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं नाटक सुरु होते. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे तेव्हा हजारो प्रयोग झाले होते. नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांची वर्णी लागली.
View this post on Instagram
महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिले तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका खूपच आवडली आणि त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत यांची निवड केली. महेश कोठारेंचा दिग्दर्शन असलेला हा पहिलाच चित्रपट होता त्यामुळे त्यांच्याकडे तेव्हा फारसे पैसे देखील नव्हते. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या सिनेमा बद्दल चर्चा केली आणि चित्रपटासाठी लगेचच होकार मिळवला. महेश कोठारेंनी लगेच खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला. फक्त एका रुपयातच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हा चित्रपट केला आणि त्या जबरदस्त सिनेमाचे नाव होते धुमधडाका. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरच्या लक्ष्याने मागे वळून पाहिले नाही! व पुढे देखील महेश कोठारेंसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले.