६ फेब्रुवारीचा तो काळा दिवस भारतीयांसाठी एक अतीव दुःखाने व्यापलेला दिवस ठरलेला! कारण याच दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी शेवटचा श्वास घेत या जगाचा अखेरचा निरोप घेतला. लता मंगेशकर म्हणजे सुरांच्या विख्यात सम्राग्नी होत्या. पण या गोष्टीचा थोडासाही गर्व त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात कधीही आढळला नाही.
नेहमी सुती साडी आणि दोन वेण्या अशा पेहरावात असणाऱ्या लता दीदी सर्वांना आपल्या मधुर आवाजाने थक्क करायच्या. त्यांच्या सुरेल आवाजातले साधे गुणगुणने ऐकणे हे म्हणजे देखील संगीतप्रेमींसाठी पर्वणी होती! पण तुम्हाला हे माहिती आहे का, की लता दीदींचे प्रभुकुंज आतून कसे दिसते ते?
लता दीदींचे प्रभुकुंज नावाचे निवासस्थान :
मुंबईतील पेडर रोड येथे आहे. ते घर इतके पॉश आहे की त्यासमोर एखादा आलिशान बंगलादेखील फिका पडेल. सुरुवातीपासूनच साधे राहणीमान जगणाऱ्या लता दीदींच्या स्वभावातील साधेपणा हाच त्यांचा सर्वात उत्तम गुण होता आणि हेच त्यांच्या घराच्या मांडणीतून जाणवते. संगीत आणि दैवत हे एखाद्या गायकाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग असतात असे सर्वश्रुत आहे आणि हेच समीकरण लता दीदींना अगदी तंतोतंत लागू पडते.
लता दीदींच्या घरात प्रवेश केल्याबरोबर लगेचच डाव्या बाजूला कृष्णाचे भव्य मंदिर आहे. लता दीदी लहानपणापासून अत्यंत धार्मिक वातावरणात वाढल्याने त्यांना पूजा-अर्चा याची विशेष आवड होतीच. त्यांचे सर्वात आवडते दैवत म्हणजे श्री कृष्ण.. म्हणूनच त्यांच्या घरी कान्हाचे एवढे भव्य मंदिर बनवले होते. लता दीदींच्या दिवसाची सुरुवात देवपूजा केल्याशिवाय होत नसे. उठल्यावर आधी पूजा आणि मग रियाज या क्रमातच त्यांच्या दिवसाची सुरुवात होत असे.
लता दीदी आपल्या पालकांचा अतोनात आदर करायच्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर तहे त्यांचे फक्त वडील नाहीतर त्यांचे गुरुदेखील होते. त्यांनी शिकवलेले संगीत असो वा त्यांनी केलेले संस्कार त्या आजतागायत कधीही विसरल्या नाहीत. मग आपल्या पालकांना कसं काय विसरतील…! लता दीदींच्या प्रभुकुंजमध्ये असलेल्या ड्रॉइंग रूममध्ये लता दीदींचे एक मोठे भिंती चित्र आहे.तिथेच बरोबर त्यासमोरील भिंतीवर त्यांच्या पालकांचे चित्र टांगलेले सगळ्यांना दिसते.
तसेच लता दीदी अगदी देवभोळ्या होत्या असे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही कारण, दरवर्षी त्या आपल्या घरी गणपती बाप्पाला आणायच्या. गणपती घरात असे पर्यंत त्यांची मनोभावे सेवा करायच्या आणि त्या सर्वांना दर्शनासाठी देखील घरी बोलवत असत. पण गेल्या दोन वर्षात कोरोना पसरल्यामुळे हे शक्य झाले नाही. पण दरवर्षीचे त्यांच्या निवासस्थानी असणारे हे सेलिब्रेशन म्हणजे मांगल्याचा एक प्रकारचा दैवी सोहळाच असायचा.
लता मंगेशकर यांना त्यांच्या पेडर रोडसमोरील घराची बाल्कनी खूप आवडायची. साल २००० मध्ये या बाल्कनीच्या प्रेमामुळे लता दीदींनी मुंबई सरकारशी देखील भांडण झाले होते. तेव्हा या पेडर रोडसमोर उड्डाण पूल बांधण्यात येणार होता. त्यावर हा उड्डाण पूल जर बांधण्यात आला तर मी मुंबई सोडून जाईन असंही त्या म्हणाल्या होत्या.
याच निवासस्थानात लता दीदींच्या रियाजासाठी खास एक वेगळी खोली राखून ठेवली होती. जिथे त्या आपल्या गाण्यांचा मनसोक्त रियाज करायच्या. त्यांच्या अशा जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही!