अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवने डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत आधी रौप्य आणि नंतर सुवर्णपदक जिंकत आपल्या देशाची मान उंचावली आहे! 800 मीटर पुरुष फ्रीस्टाइल स्विमिंग विभागात वेदांतने ही धमाकेदार कामगिरी केली आहे. या आधी देखील त्याने 1500 मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं. मुलाच्या अशा धमाकेदार कामगिरीने भारावलेल्या आर माधवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलचा आनंद व्यक्त केला होता. आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत वेदांत माधवने त्याला मिळालेल्या या विजयानंतरची प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘मला फक्त आर माधवनचा मुलगा म्हणून राहायचं नाही’ असं यावेळी त्याने मुलाखतीत म्हटले. त्याचप्रमाणे आपल्याला इथपर्यंत आणण्यासाठी आईवडिलांनी सर्वात मोठा त्याग केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
View this post on Instagram
‘दूरदर्शन इंडियाला’ दिलेल्या मुलाखतीत वेदांत यावेळी म्हणाला,: ” मला माझ्या बाबांच्या सावलीखाली जगायचं नव्हतं, मला माझं स्वतःचं नाव कमवायचं होतं फक्त आर माधवनचा मुलगा म्हणून मला राहायचं नाहीये, त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली आहे. आई आणि बाबा दोघेही माझ्यासाठी खूप काही करतात, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेला सर्वात मोठा त्याग म्हणजे ते मुंबई सोडून दुबईत राहायला आले”
गेल्यावर्षी आर माधवन त्याच्या परिवारासह दुबई या देशात राहायला गेला होता केवळ वेदांतला सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी! आर माधवनने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला.
View this post on Instagram
“कोविड मुळे मुंबईतील काही स्विमिंग पूल बंद आहेत तर काही खूपच लांब आहेत, यावेळी प्रशिक्षणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वेदांतला 2026 च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी लागणाऱ्या तयारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी कुटुंबाने हे मोठे पाऊल उचलले. दुबई मध्ये त्याला मोठ्या स्विमिंग पूलसाठी प्रवेश मिळाला आहे, सरिता आणि मी त्याच्या पाठीशी आहोत. तो ऑलम्पिक साठी तयारी करतोय” असं आर माधवनने यावेळी सांगितलं होतं.
वेदांतने मार्च 2021 मध्ये लॅटव्हिया ओपन मध्ये कास्य पदक जिंकलं होतं. गेल्या वर्षी ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिप मध्येही त्याने चार रौप्य आणि तीन कास्य पदके जिंकण्यात यश मिळवले होते! भविष्यात होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतासाठी एक पदक जिंकण्याचा वेदांत माधवनचे स्वप्न आहे!