IPL २०२२ च्या लिलावात ज्या खेळाडूंवर सर्वाधिक नजर होती, त्यापैकी एक भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन होता. यावेळच्या आयपीएल लिलावात २३ वर्षीय आक्रमक फलंदाज हा सर्वात ‘हॉट पिक’ मानला जात होता, ज्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर तेच झाले. इशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह, तो आयपीएल लिलाव २०२२ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तसेच लिलावात विकला जाणारा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे.
भारतीय संघात दाखल झालेला हा डावखुरा फलंदाज गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने सोडला होता. मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी पहिली बोली लावली. त्यानंतर पंजाब किंग्जने बेट खेळली. त्यामुळे लगेचच बोली सहा कोटींवर गेली. त्यानंतर गुजरात टायटन्सने बाजी मारली आणि १० कोटींची बोली पार केली. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ शर्यतीत सामील झाला. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरु होती. पण शेवटी मुंबईने विजय मिळवला आणि इशान किशनला १५.२५ कोटींमध्ये घेतले.
भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सर्वात उज्वल ताऱ्यांपैकी एक असलेल्या आणि आयपीएलमध्ये आपली क्षमता दाखविणाऱ्या इशान किशनने या लिलावात त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. साहजिकच, सुरुवातीपासूनच इशानसाठी उच्च बोलीची अपेक्षा होती आणि अशा परिस्थितीत ही बेस प्राइस योग्य होती. २०१६ मध्ये भारतीय अंडर-१९ संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या इशान किशनने गेल्या ४ वर्षांत या लीगमध्ये मोठी झेप घेतली आहे.
इशान किशन २०१८ पासून सतत मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र, २०१६ च्या लिलावात त्याला पहिल्यांदा गुजरात लायन्सने विकत घेतले होते. केवळ दोन वर्षे आयपीएलचा भाग असलेल्या अहमदाबादस्थित फ्रँचायझीने तत्कालीन १८ वर्षीय इशानला २० लाखांच्या मूळ किमतीत ३५ लाखांची बोली लावून विकत घेतले होते. दोन वर्षे तो या फ्रँचायझीचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्यानंतर २०१८ चा मोठा लिलाव आला, जिथे मुंबई इंडियन्सने सर्वांना मागे टाकले आणि ईशानला ६.२० कोटी रुपयांच्या उच्च किंमतीला विकत घेतले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये त्याच्या बॅटमधून २७५ आणि १०१ धावा निगल्या होत्या. या युवा फलंदाजाने ६१ सामन्यांमध्ये १४५२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १३६ आहे, तर त्याने ९ अर्धशतके केली आहेत.