टीम इंडियाने ७ जुलै २०२२ रोजी रात्री भारतीय वेळेनुसार ०२:०५ वाजता साउथम्प्टन मध्ये इंग्लंड विरुद्ध ५० धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मानेही इतिहास रचला आहे. T-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये सलग १३ विजय मिळवणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.
रोहितने विराट कोहलीकडून सूत्रे हाती घेतल्या पासून भारतीय संघ क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट मध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत आहे. हिटमॅनने कर्णधार म्हणून मिळवलेल्या १३ विजयांमध्ये भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि इंग्लंड या संघांना पराभूत केले आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितला सर्वात लहान फॉरमॅट मध्ये एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. २०२२ मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १२ सामने खेळले आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, भारताने इतर कर्णधारांच्या नेतृत्वाखाली १२ सामने खेळले आणि फक्त ४ जिंकले आहेत व ८ गमावले आहेत. हे T-२० विश्वचषक स्पर्धेचे वर्ष आहे हे लक्षात घेता, भारत या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी तयारी करत असताना ही चिन्हे आशादायक आहेत. सामन्यानंतर सादरीकरण समारंभात बोलताना रोहित शर्माने भारतीय फलंदाजांचे कौतुक केले होते. पुढे त्यांच्या कडून काय अपेक्षा आहेत हेही सांगितले.
रोहित शर्मा म्हणाला, आम्ही पहिल्याच चेंडूपासून चांगली कामगिरी केली. आम्ही चांगली फलंदाजी केली आणि सर्व फलंदाजांनी जोश दाखवला आहे. पॉवरप्लेचाही आम्ही चांगला वापर केला होता. आम्हालाही तेच हवे होते. हार्दिक आज उत्कृष्ट खेळला होता. त्याच्या गोलंदाजीने मी खूप प्रभावित झालो आहे. त्याला हे खूप पूर्वी पासून करायचे होते. आम्ही क्षेत्ररक्षणात सामान्य होतो पण त्यात आम्हाला सुधारणा करायची आहे.
या सामन्या दरम्यान रोहित शर्माने कर्णधार म्हणून T-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T-२० मध्ये १०००+ धावा करणारा तो तिसरा भारतीय कर्णधार आहे. त्याच्या आधी विराट कोहली (१५७०) आणि महेंद्रसिंग धोनी (१११२) यांनी हा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितच्या कर्णधार म्हणून T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०११ धावा आहेत. आंतरराष्ट्रीय T-२० मध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातील १० वा कर्णधार आहे. अर्शदीप सिंगबद्दल सांगायचे तर, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी अजित आगरकर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांनी ही कामगिरी केली होती.