गंभीरने पडला धोनीवर भारी! मॅच जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया झाली आहे तुफान

यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (LSG vs CSK) ६ विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत ७ आऊट २१० रन काढले होते. लखनऊनं २११ रनचं टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. लखनऊ विरूद्ध चेन्नई मॅचकडे सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्या मधील लढत म्हणूनही पाहण्यात येत होतं. या वेळी मॅचला जिंकवण्यासाठी गौतम गंभीरनं शेवटच्या क्षणी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे चेन्नईचा पराभव झाला.

लखनऊला जिंकण्यासाठी १६ बॉलमध्ये ४० रन हवे होते. त्यावेळी १८ व्या ओव्हरमध्ये दीपक हुड्डा हा प्लेयर आऊट झाला. हुड्डा आऊट झाल्यानंतर अनुभवी खेळाडू म्हणून कृणाल पांड्या बॅटींगला येईल, असा सर्वाना वाटत होतं, पण या अंदाजाला छेद देत, गंभीरनं नवोदीत आयुष बदोनीला बॅटींगसाठी मैदानावर पाठवलं. लखनऊच्या टीममध्ये ‘बेबी एबी’ या नावावं बदोनीला ओळखण्यात येते. दिल्लीच्या या तरूण खेळाडूनं कमी कालावधीत गंभीरचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे.

बदोनी या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असल्यानं त्याची खेळी देखील धोनी किंवा सीएसकेच्या अन्य खेळाडूंपैकी कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळेच ऑल राऊंडर कृणालच्या ऐवजी स्पेशालिस्ट बॅटर असलेल्या बदोनीला मैदानावर पाठवण्याची चाल गंभीरनं खेळली. आणि गंभीरची ही चाल मास्टरस्ट्रोक ठरली! बेबी एबीने एव्हिन लुईससोबत पाचव्या विकेटसाठी १९ बॉलमध्ये नाबाद ४० रणांची भागिदारी करत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

लुईस चेन्नईच्या बॉलर्सची धुलाई करत असताना बदोनीनंही त्याच्या खांद्याला खांदा लावून तुफान खेळ खेळला. बदोनीनं ९ बॉलमध्ये २ सिक्सच्या मदतीनं नाबाद १९ रन मिळवले. बदोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत सीएसकेच्या स्कोरची बरोबरी केली. त्यावेळी डग आऊटमध्ये बसलेल्या गंभीरनं उभं राहून सेलिब्रेशन केलं. गंभीरने केलेलं हे सेलिब्रेशन सोशीलमीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

आयपीएल स्पर्धेतील नवोदीत टीम असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) आपल्या नावावर पहिल्या विजयाची नोंद करण्यात यश प्राप्त केले आहे! त्यांचा यापूर्वीच्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं पराभव केला होता. तर चेन्नई सुपर किंग्स संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप