नवीन आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चेन्नईला चार वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रवींद्र जडेजा संघाचा नवा कर्णधार असेल, तो २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १५ व्या हंगामात संघाची धुरा सांभाळेल. धोनीने २००८ ते २०२१ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने १२ हंगामात चमकदार कामगिरी केली आणि केवळ एकदाच ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकले नाहीत.
View this post on Instagram
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ ९ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आणि चार वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. २०२१ मध्ये चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तसेच रोहित शर्माने कर्णधार म्हणून त्याच्यापेक्षा जास्त जेतेपद पटकावले आहेत.
चेन्नईचे नेतृत्व करणारा जडेजा तिसरा खेळाडू असेल: चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणारा रवींद्र जडेजा तिसरा खेळाडू असेल. धोनीशिवाय चिन्ना थाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने संघाची कमान सांभाळली होती. धोनी पंधराव्या हंगामात चेन्नईसाठी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल.
View this post on Instagram
धोनीने २०४ सामन्यांमध्ये CSK चे नेतृत्व केले: चेन्नईने एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल मध्ये २०४ सामने खेळले. यादरम्यान संघाने १२१ सामने जिंकले तर ८२ सामने गमावले. चार आयपीएल विजेतेपदां व्यतिरिक्त धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला दोनदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले.
महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या अनपेक्षित निर्णयाने चाहत्यांना चकित केले आहे. बुधवारी, धोनीने कर्णधार म्हणून CSK च्या नवीन हंगामाच्या जर्सीचे अनावरण केले. धोनी एका दिवसानंतर निवृत्तीची घोषणा करेल, असे त्या वेळीही कुणाला वाटले नव्हते.