टीम इंडियाच्या अडचणीत वाढ.. इंग्लंड टेस्ट आधी कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण..!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटीची तारीख जवळ आली आहे. यादरम्यान, कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणे हे अत्यंत चिंताजनक आहे. त्याचवेळी याआधी भारतीय संघाचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि फलंदाज विराट कोहली यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा सध्या सांघिक हॉटेल मध्ये आयसोलेशन मध्ये असून बीसीसीआय च्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखी खाली असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूं सोबत लंडनला गेला नाही. मात्र आता तो बरा आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, गेल्या आठवड्यात लंडन मध्ये पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता तोही बरा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलै पासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिके साठी इंग्लंडला पोहोचला होता, मात्र चार सामन्यां नंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटी नंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला होता. तोच सामना या दौऱ्यात घेतला जात आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप च्या दृष्टिकोनातून ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे.

भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यातील चार दिवसीय सराव सामना लीसेस्टर मध्ये खेळवला जात आहे. शनिवारी (२५ जून) सामन्याचा तिसरा दिवस होता. भारताने पहिल्या डावात ८ बाद २४६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी लीसेस्टरशायरचा संघ पहिल्या डावात २४४ धावांत बाद झाला. अशा प्रकारे भारताला दुसऱ्या डावात दोन धावांची आघाडी मिळाली. टीम इंडिया सध्या आपला दुसरा डाव खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात नऊ गड्यांच्या मोबदल्यात ३६४ धावा केल्या आहेत. टीम इंडियाची आघाडी आतापर्यंत ३६६ धावांची झाली आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप