ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉची तुलना भारताचा महान सलामीवीर वीरेंद्र सेहवागशी केली आहे. पृथ्वी शॉलाही वीरेंद्र सेहवागप्रमाणे स्फोटक शैलीत खेळायला आवडते, मात्र काही काळापासून पृथ्वी शॉला भारतीय संघात स्थान मिळत नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने २२ वर्षीय पृथ्वी शॉला पाठिंबा दिला आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉच्या कारकिर्दीवर मायकल क्लार्कने मोठं वक्तव्य केलं आहे. मायकल क्लार्कनेही टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मायकल क्लार्कने ‘सोनी टेन’ शी बोलताना सांगितले की, पृथ्वी शॉ हा सेहवागसारखा महान खेळाडू आहे. सेहवाग हा एक प्रतिभावान क्रिकेटपटू होता ज्याने क्रिकेटचा खेळ रोमांचक केला. माझ्या सारख्या माणसाला सेहवाग खूप आवडतो. सेहवाग हा सर्वात वरचा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे सेहवाग माझ्या आवडत्या खेळाडूं पैकी एक आहे. भारताने पृथ्वी शॉवर विश्वास ठेवावा आणि तो अजून तरुण असल्यामुळे त्याला अधिक संधी द्याव्यात अशी माझी इच्छा आहे.
२०२०-२१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यावर पृथ्वी शॉ भारतीय संघाचा भाग होता, पण अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात शॉने ऑस्ट्रेलिया विरुद्ध निराशाजनक कामगिरी केली होती. या डे- नाइट सामन्यात पृथ्वी शॉने दोन्ही डावात ० आणि २ धावा केल्या होत्या, त्यानंतर मालिकेतील इतर सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
तेव्हापासून शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, मात्र त्याला भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही. आयपीएल २०२२ साठी, दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्याला ८ कोटी रुपयां मध्ये रिटेन केले आहे.
पृथ्वी शॉची एकदिवसीय करियर : सप्टेंबर २०१८ मध्ये, त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. ५ फेब्रुवारी २०२० मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, जिथे त्याने २१ चेंडूत २० धावा केल्या होत्या.
पृथ्वी शॉची कसोटी करियर : ४ ऑक्टोबर २०१८ मध्ये, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते, जिथे त्याने १५४ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात, त्याने कसोटीतील पहिले शतक झळकावले आणि भारतासाठी पदार्पणात कसोटी शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज बनला होता.
पृथ्वी शॉची T-२० करियर : जून २०२१ मध्ये, त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि T-२० आंतरराष्ट्रीय (T-२०) संघात स्थान देण्यात आले होते. त्याने २५ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, जेथे तो एकही धाव न घेता बाद झाला होता.