‘पावनखिंड’सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही दिमाखात फडकवला आपला झेंडा, सलग तीन दिवसांत एवढी तंगडी कमाई केली!!

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे अशी चर्चा मराठी सिनेसृष्टीत जोरदार पसरली आहे!

शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. पहिल्याच दिवशी १५३० शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दिमाखात दाखल झाला. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला १९१० शो मिळाले. याचा परिणाम म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तुफान कमाई केली आहे.

यामुळेच मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. झिम्मा, पांडू, झोंबिवली, लोच्या झाला रे या चित्रपटांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. त्यानंतर ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असल्याचं कळतंय.आणि
हा आकडा पुढील दिवसांत निश्चितच वाढणार आहे.

‘पावनखिंड’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. अखेर १८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला! पुष्पा या साऊथच्या सुपरहिट चित्रपटाला डोक्यावर घेतल्यानंतर मराठी प्रेक्षक पावनखिंड सिनेमाला ही तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद देताना दिसत आहेत!

चित्रपटाची कथा त्याची मांडणी त्यातील गाणी त्यातील दृश्य या सगळ्याच बाबतीत पावनखिंड हा सिनेमा वरचढ ठरत आहे! महाराष्ट्रातील नेटकरी सोशल मीडियावर पावनखिंड सिनेमा पाहून त्यावर दमदार रिव्ह्यू देऊन त्यातील शॉर्ट व्हिडिओ, फोटोज शेअर करून धुमाकूळ घालत आहेत.

या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणेच जिजाऊंची भूमिका तितक्याच तळपत्या रुपात उभी केली आहे. बाजीप्रभूंची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अजय पुरकर यांनी या भूमिकेचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललेले दिसत आहे. सगळीकडे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय! प्राजक्ता माळी, क्षिती जोग, माधवी निमकर, समीर धर्माधिकारी, उज्वला जोग, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, अंकित मोहन या कलाकारांनी देखील या चित्रपटात जीव ओतला आहे. उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांनी साकारलेला दमदार अभिनय यामुळे ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप