आयपीएल ही नेहमीच फलंदाजांची आवडती लीग मानली जाते. क्रिकेटच्या या T-२० लीगमध्ये चाहत्यांना सर्वाधिक चौकार आणि षटकार पाहायला मिळतात आणि त्यांचा एकच हेतू असतो की, आपल्या आवडत्या खेळाडूने सामन्यात जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. आयपीएलमध्ये गोलंदाजांवर सर्वाधिक दबाव असतो कारण त्यांना त्यांच्या संपूर्ण षटकात फलंदाजांना मोठे शॉट्स खेळण्यापासून रोखावे लागते तसेच त्यांची विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. पण आयपीएलमधील कोणत्याही गोलंदाजासाठी हे काम अजिबात सोपे नाही.
आयपीएलच्या इतिहासात असे अनेक गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत फलंदाजांना शांत ठेवले आहे. यामध्ये ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगा आणि अमित मिश्रा या नावाजलेल्या गोलंदाजांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय चालू मोसमात युझवेंद्र चहल, कागिसो रबाडा आणि कुलदीप यादवही हे काम चोख बजावताना दिसत आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या काही गोलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत एका मोसमात २० हून अधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे आणि त्यांनी हा पराक्रम एकदा नव्हे तर अनेक वेळा केला आहे. त्या ३ गोलंदाजांबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी आपल्या आयपीएल कारकिर्दीत एका हंगामात २० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
युझवेंद्र चहल: (४ वेळा): टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या १५ व्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. या संघाकडून खेळताना ३१ वर्षीय गोलंदाजाने ११ सामन्यांत १४.५० च्या सरासरीने २२ फलंदाजांना आपले शिकार बनवले आहे. अशाप्रकारे चहलने आयपीएल कारकिर्दीत २० हून अधिक विकेट्स घेण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी, चहलने आयपीएलच्या आठव्या हंगामात (२३), नवव्या हंगामात (२१) आणि तेराव्या हंगामात (२१) बळी घेतले आहेत. चहलने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळून आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. आपल्या दहा वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत, या लेग-स्पिनरने १२५ सामन्यांत १६१ विकेट घेतल्या आहेत.
View this post on Instagram
लसिथ मलिंगा: (३ वेळा): श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज आहे. मलिंगाच्या नावावर आयपीएलमध्ये १७० विकेट्स १२२ सामन्यांमध्ये मिळवल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळताना मलिंगाची आयपीएल कारकीर्द चांगली होती. आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात पदार्पण करणाऱ्या मलिंगाने आयपीएलच्या चौथ्या मोसमात पहिल्यांदाच २० हून अधिक बळी घेतले होते. २०११ मध्ये मलिंगाने १६ सामन्यात २८ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. यानंतर या गोलंदाजाने २०१२ मध्ये २२ आणि २०१५ मध्ये २४ विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे मलिंगाने कारकिर्दीत तीन वेळा २० हून अधिक विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
सुनील नरेन: (३ वेळा): ३३ वर्षीय अष्टपैलू सुनील नरेनने २०१२ मध्ये राजस्थानविरुद्ध पहिला आयपीएल सामना खेळला होता. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या तीन हंगामात खेळताना, या फिरकीपटूने प्रत्येक सीजन मध्ये २० पेक्षा जास्त विकेट्स घेण्यास यश मिळविले होते. नरेनने आयपीएलच्या पाचव्या हंगामात २४, सहाव्या हंगामात २२ आणि सातव्या हंगामात २१ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आतापर्यंतच्या IPL प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, या फिरकीपटूने १४५ सामन्यांमध्ये ६.६२ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने १५१ विकेट घेतल्या आहेत.