क्रिकेट हा एक खेळ आहे जो भारतात खूप आवडला जातो. कोणत्याही देशाच्या युवा खेळाडूचे सर्वात मोठे स्वप्न असते ते एक दिवस आपल्या देशाच्या संघासाठी खेळणे. पण त्यासाठी त्याला वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते, तरच एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. काही दुर्दैवी खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळत नाही. संधी मिळणाऱ्या खेळाडूंना संघातील स्थान पक्के करण्यासाठी आणि चांगली कामगिरी करत राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आज या लेखात आपण अशा ६ खेळाडूंबद्दल बोलणार आहोत ज्यांना भारतासाठी फक्त एक वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते संघात परत येऊ शकले नाहीत.
भागवत चंद्रशेखर: भागवत चंद्रशेखर हा भारतीय क्रिकेट संघाच्या दिग्गजांपैकी एक आहे, ज्याच्या कसोटी कारकिर्दीत गोलंदाजीचे आकडे पाहण्यासारखे आहेत. चंद्रशेखरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २४२ विकेट घेतल्या आहेत, पण त्याची एकदिवसीय कारकीर्द तितकी चांगली नव्हती. चंद्रशेखरने २२ फेब्रुवारी १९७६ रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना खेळला होते. या सामन्यात चंद्रशेखरने ७ षटके टाकली होती, ज्यात त्याने ३६ धावा देत ३ बळी घेतले होते. एवढी चांगली कामगिरी करूनही चंद्रशेखरला पुन्हा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
पंकज धर्मानी: पंकज धर्मानी हा एक यष्टीरक्षक फलंदाज होता ज्याने २३ ऑक्टोबर १९९६ रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात धर्मानीला फक्त ८ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा २७ धावांनी पराभव केला होता.
डोडा गणेश: डोडा गणेश हा कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला होता, तो ९० च्या दशकातील उगवता गोलंदाज होता. १९९७ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वेला जात असताना गणेशची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली होती. यादरम्यान गणेशला १५ फेब्रुवारी १९९७ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. गणेशने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ५ षटके टाकली ज्यात त्याने २० धावांत एक बळी घेतला होता.
पंकज सिंग: २००९ मध्ये देशांतर्गत वेगवान गोलंदाज पंकज सिंगने चमकदार कामगिरी केली होती. ज्याच्या आधारावर झिम्बाब्वे, भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती. पंकज सिंगने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिला आणि शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध २०१० मध्ये खेळला होता. या सामन्यात पंकजने ७ षटके टाकून एकही विकेट न घेता ४५ धावा दिल्या होत्या.
परवेझ रसूल: जम्मू-काश्मीरचा गोलंदाज परवेझ रसूलने भारतासाठी पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना ५ वर्षांपूर्वी २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे खेळला होता. टीम इंडियाने हा सामना ७ विकेटने जिंकला होता. या सामन्यात रसूलने १० षटकात ६० धावा देत २ बळी घेतले होते. या सामन्यानंतर तो भारताच्या वनडे संघात परत येऊ शकला नाही.