क्रिकेट मध्ये अनेक तुफानी वेगवान गोलंदाज आहेत. सध्याच्या काळा बद्दल बोलायचे झाले तर असे अनेक धोकादायक वेगवान गोलंदाज आहेत ज्यांचा ताशी १५० किमीचा वेग फलंदाजांना घाबरवणारा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघांमध्ये असे अनेक वेगवान गोलंदाज आहेत.
वेगाच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघा बद्दल बोलायचे झाले तर असे गोलंदाज फार कमी पाहायला मिळतात. भारतीय क्रिकेटमध्ये एका वेगवान गोलंदाजाने एन्ट्री मारली आहे. तो दुसरा कोणी नसून जम्मू-काश्मीरचा उमरान मलिक आहे. आयपीएल मध्ये उमरान मलिक सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे, ज्याने आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांच्या मनात घर केलं आहे.
प्रत्येक सामन्यात १५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकला आता फलंदाज घाबरले आहेत. उमरान मलिकचा हा फॉर्म पाहून त्याच्या साठी भारतीय संघात प्रवेश करण्याच्या पूर्ण संधी निर्माण होत आहेत. आपल्या गोलंदाजीच्या वेगाने हैराण करणाऱ्या उमरान मलिकची गोलंदाजी पाहून अनेक दिग्गज त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. भारताकडे सध्या अनेक वेगवान गोलंदाज आहेत, ज्यामध्ये फार कमी गोलंदाजांचा वेग १४५ किमी प्रतितास आहे.
View this post on Instagram
त्याने टाईम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत दिली ज्यामध्ये तो म्हणला, जेव्हाही पंजाबची टीम जम्मूमध्ये यायची, तेव्हा मला बोलावले जायचे. मी स्थानिक संघाला सामने जिंकण्यासाठी मदत करायचो. यानंतर माझी जम्मू-काश्मीर अंडर-१९ संघाच्या चाचणीत निवड झाली. अब्दुल समद याच्याकडे मी नियमित सराव करायचो. समद भाईंनी मला खूप मदत केली. त्याने माझ्या गोलंदाजीचे व्हिडिओ सनरायझर्स हैदराबादला पाठवले होते. प्रथम सनरायझर्स हैदराबादने माझी नेट बॉलर म्हणून निवड केली होती. यानंतर मला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता मग मी सामने खेळलो आणि चांगली कामगिरी केली.
जेव्हा उमरान मलिकला त्याच्या गोलंदाजीच्या वेगा बद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला, जेव्हा कोणी मला सांगते की तू खूप हळू गोलंदाजी करत आहेस तेव्हा माझ्या भावना जाग्या होतात. मी वेगवान गोलंदाजी सुरू करतो. जम्मू-काश्मीरचा हा युवा वेगवान गोलंदाज भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रेरणास्थान मानतो, पण त्याला आदर्श मानत नाही. तो स्वतःला आपला आदर्श मानतो. तो म्हणाला, डेल स्टेन सारखा दिग्गज गोलंदाज डग आऊट मध्ये असणे खूप छान आहे. तो पुढे म्हणाला की भारतासाठी खेळणे आणि चांगली कामगिरी करणे हे माझे लक्ष्य आहे.