रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्याची गोष्ट जगजाहीर झाली आहे, त्यामुळेच जगभरात याचे वेगवेगळे पडसाद दिसू लागले आहेत. सध्या युक्रेनमध्ये १८ हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी तिकडे असल्याचे समजते. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. पण भारतीय विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षणासाठी युक्रेनलाच का निवडले? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या कारणाने उपस्थित झालेला आहे. चला तर मग या लेखातून समोर उभ्या ठाकलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया!
देवरियाचे उद्योगपती नरेंद्र कुमार आपल्या मुलाला शिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात असल्याचे वृत्त समजते, व्हिसाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाला एमबीबीएसच्या उर्वरित शिक्षणासाठी रशियाला पाठवता येईल या हेतूने मुलाला घेऊन ते दिल्लीला जाऊन थडकणार होते. पण रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे त्यांना आपले प्लानिंग तात्पुरते थांबवावे लागले आहे.
रशिया आणि युक्रेन हे असे देश आहेत जिथे भारतातील हजारो मुले दरवर्षी अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र या विषयांच्या शिक्षणासाठी जातात. भारतीय दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या एकट्या युक्रेनमध्ये साधारण १८ हजार भारतीय विद्यार्थी तेथे शिकण्यासाठी गेले आहेत. भारतात एमबीबीएसच्या तब्बल ८० हजारांपेक्षा जास्त जागा असताना ही मुले तिथे का जातात, असा प्रश्न सर्वांना पडला आहे! स्टडी इंटरनॅशनल या सोर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये २४ टक्के भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी आले आहेत.
२०११ ते २०२२ या कालावधीत भारत आणि इतर देशांमधून युक्रेनमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समजते. युक्रेनमध्ये एकूणच सुमारे ७६ हजार परदेशी विद्यार्थी असल्याचे समजते, त्यापैकी १८ हजार भारतीय आहेत. जे एकूण परदेशी विद्यार्थ्यांच्या २४ टक्के आहेत. युक्रेनच्या शिक्षण व्यवस्थेत भारतीय विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
भारतातून युक्रेनला जाणारे खूप सारे विद्यार्थी एमबीबीएमचे शिक्षण घेण्यासाठी तिकडे गेले आहेत. युक्रेन मध्ये मिळतो कमी खर्चात अगदी सहज प्रवेश!: PrologAbroad या वेबसाइटने जाहीर केलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये प्रामुख्याने महत्वाची १८ वैद्यकीय विद्यापीठे आहेत.
जिथे ६ वर्षांच्या एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी २० ते २५ लाख रुपये खर्च येतो आणि अशीच दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे तिथल्या अभ्यासात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा नसते. भारतामध्ये विद्यार्थ्यांना नीट परीक्षेला आधी तोंड द्यावे लागते आणि मगच त्यात मिळालेल्या स्कोअरकार्डवरूनच प्रवेश ग्राह्य धरण्यात येतो.
भारतात प्रवेशासाठी अधिक गुणवत्ता लागते. थोडक्यात मेडिकलच्या प्रवेशासाठी भारतात खूप मोठी स्पर्धा लागली आहे. त्यामुळे जी मुले भारतात या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाहीत, ते विद्यार्थी युक्रेनमध्ये प्रवेश घेण्यसाठी प्राधान्य देतात असे वृत्त समजते. भारतातील खासगी महाविद्यालयातून एमबीबीएस या पदवीचा अभ्यास करण्यासाठी तब्बल ५० ते ६० लाख रुपये खर्च येतो. हाच खर्च सरकारी महाविद्यालयांमध्ये ८ ते १० लाख रुपयांपर्यंत जातो आणि तिकडे देखील यासाठी प्रवेश मिळविणे अवघड काम असते. या सर्व बाबी पाहता भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये हा खर्च सर्वात कमी होतो. त्यामुळे भारतातून युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसते.